

Delhi car blast case : दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके साठवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लखनौ येथील महिला डॉक्टर शाहीन शाहिद हिच्याकडे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ची महिला शाखा जमात-उल-मोमिनत भारतात स्थापन करण्याचे काम सोपवण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, जैशमधील महिलांचे नेतृत्त्व हे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर यांची बहीण सादिया अझहर पाकिस्तानमध्ये करत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. सादिया अझहरचा पती युसूफ अझहर हा कंधार अपहरणातील सूत्रधार होता आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो मारला गेल्याचे वृत्त आहे.\
रिपोर्टनुसार, डॉ. शाहीन शाहिद ही लखनऊच्या लाल बागची रहिवासी आहे. फरीदाबादमध्ये जैशच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि तिच्या कारमधून एक असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली होती. यानंतर तिला अटक करण्यात आली. ती काश्मिरी डॉक्टर मुझम्मिल गनी उर्फ मुसैबच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
डॉक्टर मुसैब याला फरिदाबादमधील त्याच्या भाड्याच्या दोन खोल्यांमधून २,९०० किलो स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ जप्त केल्यानंतर अटक झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी असलेला मुझम्मिल दिल्लीपासून सुमारे ४५ किमी अंतरावर असलेल्या धौज येथील अल फलाह विद्यापीठात डॉक्टर होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ श्रीनगरमध्ये लावलेल्या पोस्टर्सच्या प्रकरणात मुझम्मिलला वॉन्टेड व्यक्ती म्हणून जाहीर केले यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलीस तपासात स्पष्ट झाले की, असॉल्ट रायफल, पिस्तूल आणि दारूगोळा साठवण्यासाठी वापरण्यात आलेली कार शाहीन शाहिदची होती. पोलिसांनी मुझम्मिलची चौकशी केल्यानंतर फरिदाबादचा कोड HR ५१ असलेली लायसन्स प्लेट असलेली मारुती सुझुकी स्विफ्टची झडती घेण्यात आली.त्याच्या खुलाशांमुळे पोलिसांना अमोनियम नायट्रेट, २० टायमर आणि इतर संशयास्पद वस्तू असल्याचा संशय असलेल्या स्फोटक पदार्थांचा मोठा साठा सापडला.
भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान जबरदस्त दणका बसल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने भारतासह इतरत्रही आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आ ऑक्टोबरमध्ये जमात-उल-मोमिनत नावाच्या त्यांच्या पहिल्या महिला शाखेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, नवीन युनिटसाठी भरती ८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील बहावलपूर येथील मरकझ उस्मान-ओ-अली येथे सुरू झाली. मसूद अझहरची बहीण सादिया अझहर याची प्रमुख आहे, जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर्सच्या पत्नी तसेच बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मानसेरा येथील त्यांच्या केंद्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांची भरती करत असल्याचे वृत्त आहे.