Delhi Red Fort Blast: राजधानीत रक्ताचा सडा!

संध्याकाळच्या गर्दीत तो स्फोट झाला आणि...
Delhi Red Fort Blast
राजधानीत रक्ताचा सडा!
Published on
Updated on

नवी दिल्ली ः तारीख होती 10 नोव्हेंबर 2025, वार सोमवार. राजधानी दिल्लीची संध्याकाळ नेहमीप्रमाणेच व्यस्त आणि गजबजलेली होती. लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि आसपासचा बाजार परिसर लोकांच्या वर्दळीने फुलून गेला होता. कोणी घरी परतण्याच्या घाईत होते, तर कोणी खरेदीत मग्न; पण पुढच्याच क्षणी काय भयंकर वाढून ठेवलेय, याची कुणालाही पुसटशीही कल्पना नव्हती.

Delhi Red Fort Blast
Delhi car blast |दिल्ली बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र हाय अलर्ट!

घड्याळाचे काटे संध्याकाळचे 6 वाजून 52 मिनिटांवर आले होते. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनकडून एक आय-20 कार (एचआर 26 सीई 7674) लाल किल्ल्यावरून दर्यागंजच्या दिशेने निघाली होती. लाल सिग्नलजवळ गाडी थांबली आणि त्याच क्षणी... एक कानठळ्या बसवणारा, आसमंत हादरवणारा प्रचंड स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज सुमारे चार किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. ज्या आय-20 कारमध्ये स्फोट झाला, ती अक्षरशः आगीचा गोळा बनून कित्येक मीटर उंच हवेत उडाली आणि छिन्नविच्छिन्न होऊन खाली कोसळली. क्षणात सगळे चित्र पालटले. लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली, जो तो जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागला. किंकाळ्या, आक्रोश आणि धुराच्या लोटांनी संपूर्ण परिसर भरून गेला. गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.

या भयंकर स्फोटाची झळ आजूबाजूच्या वाहनांनाही बसली. स्फोटाच्या तडाख्यात सहा वाहने अक्षरशः तुकड्या-तुकड्यांमध्ये उडाली, तर 20 हून अधिक गाड्यांचे मोठे नुकसान झाले; पण सर्वात भीषण होते ते मानवी हानीचे दृश्य. स्फोटाच्या केंद्रस्थानी असलेल्या आय-20 मधील तिघांसह आजूबाजूचे पादचारी, ई-रिक्षा आणि दुचाकीस्वार मिळून एकूण 9 निष्पाप लोकांनी जागीच प्राण गमावले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, शरीराचे अवयव 100 मीटरच्या परिसरात विखुरले होते. या हल्ल्यात 20 जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिस दलात खळबळ उडाली. तातडीने पोलिस अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; 19 जखमींना लोकनायक रुग्णालयात, तर एकाला काश्मिरी गेट ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. हा केवळ अपघात नव्हता, हे स्पष्ट होताच दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड आणि सर्व केंद्रीय तपास यंत्रणांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अमित शहा यांनी आधी लोकनायक रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यानंतर थेट घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भ्याड हल्ल्याने दिल्ली पुन्हा एकदा हादरली होती आणि चौदा वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेटजवळ झालेल्या स्फोटाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या.

Delhi Red Fort Blast
Delhi Red Fort Blast: दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच, 'जैश' चा हात 4 डॉक्टरांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news