नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी, २०२५ मध्ये होणार आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष, विरोधी भाजप आणि काँग्रसने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. गुरुवारी, सत्ताधारी आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पक्षाने ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यापैकी ६ उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमधून आपमध्ये दाखल झालेले आहेत.
छतरपूरमधून ब्रह्मसिंह तंवर, लक्ष्मी नगरमधून बी.बी. त्यागी आणि किराडी विधानसभा मतदासंघामधून अनिल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तीनही नेते काही दिवसांपूर्वी नुकताच भाजपला रामराम ठोकून आम आदमी पक्षात आले आहेत. तर झुबेर चौधरी यांना सीलमपुरमधून, वीरसिंह धिंगान यांना सीमापुरी मतदारसंघातून आणि सुमेश शौकीन यांना मटियाला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हे तीन नेते नुकतेच काँग्रेसमधून आपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच विश्वास नगरमधून दीपक सिंघला, रोहतास नगरमधून सरिता सिंह, बदरपुर मतदारसंघातून राम सिंह, घोंडामधून गौरव शर्मा, करावल नगर विधानसभेतून मनोज त्यागी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०२५ रोजी संपत आहे. सध्याच्या सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले होते. तर काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते