

नवी दिल्ली : ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या उपग्रह आधारित नवीन मूल्यांकन अहवालानुसार पीएम 2.5 प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीने देशात सर्वोच्च पातळी गाठली आहे. मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीतील वार्षिक सरासरी पीएम 2.5 एका घनमीटरमध्ये 101 मायक्रोग्राम नोंदवली गेली, जी राष्ट्रीय मर्यादेच्या (40 मायक्रोग्राम) अडीच पट आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या तब्बल 20 पट अधिक आहे.
या यादीत चंदीगड (70 मायक्रोग्राम) दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यानंतर हरियाणा (63) आणि त्रिपुरा (62) यांचा क्रमांक लागतो. आसाम (60), बिहार (59), पश्चिम बंगाल (57) आणि पंजाब (56) यासह इतर अनेक राज्यांनीही राष्ट्रीय मानकांचे उल्लंघन केले आहे. देशातील एकूण 749 पैकी 447 जिल्ह्यांमध्ये (सुमारे 60 टक्के) वार्षिक पीएम 2.5 मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वाधिक प्रदूषित 50 जिल्ह्यांमध्ये दिल्ली आणि आसामचा प्रत्येकी 11 जिल्ह्यांसह मोठा वाटा आहे, त्यापाठोपाठ बिहार आणि हरियाणाचा क्रमांक लागतो (प्रत्येकी 7).