पुढारी ऑनलाईन डेस्क : संरक्षण मंत्रालय आज (दि.६) पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर वेपन सिस्टीमसाठी १०,२०० कोटी रुपयांचा करार करणार आहे. ( Pinaka rocket deal) नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज आणि मुनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) कंपनीसोबत हा करार हाेणार आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने गेल्या आठवड्यात भारतीय लष्करास दारूगोळा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. हा प्रकल्प नागपूरस्थित रॉकेट निर्माता सोलर इंडस्ट्रीज आणि माजी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कंपनी असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) यांच्यात विभागला जाणार आहे.
१३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलताना लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते की, ५,७०० कोटी रुपयांच्या दारूगोळ्यासह पिनाका रॉकेट खरेदी करार आणि ४,५०० कोटी रुपयांच्या एरिया डिनायल दारूगोळ्याचा करार सरकारकडून लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे. भारतीय संरक्षण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आधीच पिनाका रॉकेटच्या १२० किमीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदणाच्या टप्प्यात आहे.
पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट सुमारे ४५ किलोमीटर टप्प्यातील लक्ष्यावर प्रहार करु शकते. हे रॉकेट लाँचर पाकिस्तान आणि चीन दोन्ही सीमेवर खूप प्रभावी ठरू शकते. लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, पिनाकाच्या लांब पल्ल्याच्या आवृत्त्या तयार झाल्यानंतर लष्कर इतर पर्यायी शस्त्रांच्या वापर थांवबू शकते. पिनाका हे निर्यात क्षेत्रात आधीच एक मोठी यशोगाथा बनले आहे.