नवी दिल्लीः दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी शुक्रवारी १९८४ च्या दंगलीतील पीडितांच्या भरतीसाठी पात्रता शिथिल करण्याची घोषणा केली. नायब राज्यपालांच्या संमतीने, एमटीएस पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता १० व्या इयत्तेवरून ८ वी पर्यंत कमी करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा अनेकांना होणार आहे. १९८४ दंगलग्रस्तांना मदत आणि न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे नायब राज्यपाल सक्सेना यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी सांगितले की "१९८४ ची शीख दंगल भारतीय लोकशाहीवर एक कलंक होती. मानवी हक्कांच्या सर्व मानकांचे उल्लंघन करून एका विशिष्ट अल्पसंख्याक समुदायावर भयंकर अत्याचार केले गेले."ते पुढे म्हणाले, " दंगलीतील पीडितांनी सहन केलेला आघात आणि त्रास आणि गेल्या ४ दशकांपासून काही कुटुंबांना मदत मिळाली नाही. हे लक्षात घेता, मानवतावादी दृष्टिकोनाची गरज आहे." त्यामूळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.