

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांचा महागाई भत्ता (डीए) ३ टक्क्य़ाने वाढवला जाऊ शकतो. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू मानली जाईल आणि गेल्या ३ महिन्यांची थकबाकी देखील ऑक्टोबरच्या वेतनात किंवा पेन्शनमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे.
सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता सुधारते. पहिली सुधारणा होळीपूर्वी जानेवारी-जूनसाठी आणि दुसरी दिवाळीपूर्वी जुलै-डिसेंबरसाठी केली जाते. यंदा दिवाळी २०-२१ ऑक्टोबर रोजी आहे त्यामुळे ही वाढ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाऊ शकते. गेल्या वर्षीही सरकारने दिवाळीच्या दोन आठवडे आधी महागाई भत्ता वाढ जाहीर केली होती.
महागाई भत्ता किती वाढेल?
नवीन वाढीनंतर महागाई भत्ता ५५% वरून ५८% पर्यंत वाढेल. हा बदल जुलै २०२५ पासून लागू होईल आणि ३ महिन्यांची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात एकत्रितपणे मिळेल. ही वाढ विशेष आहे कारण ७ व्या वेतन आयोगातील ही शेवटची वाढ असेल. ७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.