

नीमराणा (राजस्थान); वृत्तसंस्था : ऑनलाईन जगातील प्रेम, लग्नाच्या आणाभाका आणि प्रेयसीला भेटण्यासाठी थेट सातासमुद्रापार केलेला प्रवास; मात्र वयाचे सत्य समोर येताच अवघ्या दोन दिवसांत या प्रेमकहाणीचा करुण अंत झाला. ६१ वर्षीय कॅनेडियन महिलेशी लग्न करण्यास एका भारतीय तरुणाने नकार दिल्याने हे प्रकरण थेट कॅनेडियन दूतावास आणि पोलिसांपर्यंत पोहोचले.
सुमारे वर्षभरापूर्वी एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. दररोजच्या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. याच ओढीने ही महिला टुरिस्ट व्हिसावर ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीत दाखल झाली. हरियाणातील पानिपतचा नितीन तिला घेण्यासाठी विमानतळावर गेला होता. तेथून तो तिला राजस्थानच्या कोटपुतली-बहरोड जिल्ह्यातील नीमराणा येथील 'बीबी बिल्डर्स सोसायटी'मधील आपल्या मामा-मामीच्या फ्लॅटवर घेऊन गेला.
दोन दिवस एकत्र राहिल्यानंतर संबंधित महिलेचे वय ६१ वर्षे असल्याचे नितीनच्या लक्षात आले. वयातील हे मोठे अंतर समजताच त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या महिलेने १३ नोव्हेंबर रोजी थेट कॅनेडियन दूतावासाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. दूतावासाने तत्काळ स्थानिक पोलिसांना सतर्क केले. १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी नितीनला अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तर, कॅनेडियन महिलेला कोटपुतली येथील एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
दूतावासाशी समन्वय सुरू
नितीन हा पानिपत येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संबंधित महिलेला सुखरूप मायदेशी परत पाठवण्यासाठी कॅनेडियन दूतावास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे.