

अनिल साक्षी
जम्मू : काश्मीर आता प्रचंड थंडीच्या अधीन झाले आहे. अनेक भागांत तापमान शून्याखाली गेले असून सुप्रसिद्ध दल सरोवरदेखील गोठू लागले आहे. मंगळवारची रात्र कडाक्याची गेली. बहुतांश ठिकाणी किमान तापमान गोठण बिंदूपेक्षा खाली नोंदवले गेले. यामध्ये गुलमर्ग उणे 5.5 डिग्रीसह सर्वात थंड ठिकाण ठरले; मात्र सर्वात कमी तापमान जोजिला खिंडीमध्ये -18.0 डिग्री इतके नोंदवले गेले.
जम्मू विभागात तुलनेत तापमान जास्त होते. जम्मू शहरात 8.4 डिग्री, कटरा 9.5, बटोत व डोडा 6.5, सांबा 3.3, राजौरी 2.0 आणि भद्रवाहमध्ये तापमान 0.8 डिग्री झाले. उधमपूर आणि बनिहाल येथे अनुक्रमे 4.8 व 5.4 डिग्री तापमान नोंदवले गेले.
लडाखच्या थंड वाळवंटात तापमानात मोठी घसरण झाली. लेह -5.5, कारगिल -5.1 आणि नुब्रा खोर्यात -2.5 तापमान नोंदवले गेले. पहलगाममध्ये तापमान उणे 3.6 डिग्रीपर्यंत खाली गेले, तर सोनमर्गमध्ये उणे 1.6 डिग्री नोंदवले गेले. उत्तर काश्मीरमध्ये कुपवाडा येथे उणे 4.2 , बारामुल्ला उणे 4.5 आणि जेथन राफियाबादमध्ये उणे 4.8 तापमान नोंदवले गेले. कुलगाम -0.6 आणि गंदरबल -0.9 भागांत तापमान गोठण बिंदूपेक्षा खालीच आहे.
काश्मीर विभागात तापमान गोठण बिंदूखाली
श्रीनगरमध्ये तापमान उणे 1.9 नोंदवले गेलेे. काजीगुंडमध्ये -1.6, कोकरनागमध्ये -1.8, पंपोरमध्ये -2.5 आणि बडगाममध्ये -3.0, तर दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग व बांदीपोरा येथे -2.6, पुलवामा आणि शोपियां येथे अनुक्रमे -3.7 आणि उणे 4.3 तापमान आहे.