‘डॅडी’ची दगडी चाळ नेमकी काय होती? 

Published on
Updated on

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क 

मुंबई जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचं शहर. येथील ब्रिटिशकालीन वास्तू पर्यटकांना आजही भूरळ घालतात. येथील लोकवस्तीचा आढावा घेतल्यास दाटीवाटीने राहणाऱ्या घरांची एक चाळ संस्कृती आपल्या नजरेस पडते. चाळ म्हणजे मध्यमवर्गीयांच राहण्याचं एक हक्काचं ठिकाण. येथेच पु. लं. ची बटाट्याची चाळ असो वा अनेक महाराष्ट्रातील संस्कृतीचा कार्यक्रम असो, या चाळींना महत्त्व आलं. मुंबईतील अनेक चाळींपैकी एक महत्त्वाची चाळ म्हणजे कधीकाळीचा गुन्हेगारी जगताचा डॉन अरुण गवळीची 'दगडी चाळ'…

'मुंबईमधील दगडी चाळ पाडणार' अशी बातमी जेव्हा प्रसिध्द झाली, तेव्हा या लक्षणीय चाळीचं एक वेगळचं आकर्षण झालं होतं. आता दगडी चाळ पाडणार म्हटल्यावर ही चाळ पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. ही चाळ पाडून तेथे म्हाडा ४० मजली दोन टॉवर उभारणार आहे. गँगस्टर अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत. गुन्हेगारी विश्वातील अनेक नाट्यमय घडामोडींची साक्षीदार असलेली दगडी चाळ नेमकी काय आहे? याचा घेतलेला हा मागोवा. 

मुंबईत झाकोळल्या गेलेल्या अनेक चाळी आहेत. पण, अशा काही चाळी आहेत, ज्या मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आल्या. त्यापैकी एक आहे दगडी चाळ. आताच्या पिढीला दगडी चाळ ही चित्रपटांमधून समजली. 'डॅडी' अर्थातचं अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळ हे बनलेलं समीकरण चित्रपटांमधून दाखवलं गेलं. अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिध्द झाली… 

मुंबईत जिथे जिथे मिल (गिरणी) उभी राहायची, त्याच्या आजूबाजूलाचं कामगारांची चाळ उभी राहायची. तेथून कामगार एकत्र कामाला जायचे. अरुण गवळी त्यापैकी एक होता. तो खटाव मिलमध्ये कामाला होता आणि तो ज्या चाळीत राहायचा, ती 'खटाव मिलवाल्यांची चाळ' म्हणून ओळखली जायची. ती पुढे 'दगडी चाळ' म्हणून प्रसिध्द झाली.   

दगडी चाळ नेमकी काय आहे? 

मुंबईतील कामगारांच्या चाळींसमोर एक मोठे प्रवेशद्वार असायचे. या प्रवेशद्वारामुळे चाळीतील लोक सुरक्षित राहायचे. प्रत्येक चाळीच्या गेटवर प्रत्येक मिलचं नाव लिहिलेलं असायचं. दगडी चाळीचं गेट हे दगडांबासून बनवलेलं आणि प्रश्स्त होतं, त्यावरून 'दगडी चाळ' हे नामकरण झालं. या चाळीसमोर एक सिमेंटची चाळ होती. दुसऱ्या बाजूला 'लाल विटांची चाळ' ओळखली जायची. लाल विटांच्या चाळीत रमा नाईक राहायचा. (रमा नाईक स्मगलिंगच्या धंद्यात होता.) खटाव मिल उभी राहिल्यानंतर तेथील कामगार भायखळाच्या आजूबाजूला ज्या चाळी होत्या, तेथे राहायचे.

साधारणपणे १९८० -८१ नंतर मुंबईचं आणि गुन्हेगारी विश्वाचं चित्र बदलत गेलं. त्याआधी करीमलाला असेल, हाजीमस्तान असेल, युसूफ पटेल असेल आपापसांत त्यांच्यामध्ये स्मगलिंगवरून वाद व्हायचे. त्यावेळी दगडी चाळ एवढी प्रसिध्द नव्हती. 

पिढ्यानपिढ्या कामगार चाळीत राहायचे. सात रस्ता या भागात गिरणी कामगार राहायचे. तेथे युनायटेड मिल आणि अन्य मिल्स होत्या. येथील कामगारांची आसपासच्या चाळीत वस्ती असायची. मिलमधील आंदोलने, यावेळी सर्व मिलमधील कामगार एकत्र यायचे.  

खटाव मिल जेव्हा बंद झाली, तेव्हा खटाव मिलच्या मालकाने काही गुन्हेगार माणसं आणली. तेव्हा मालकाकडून आमच्यावर अन्याय होतो, या भावनेने कामगारांचा संताप उफाळायचा. यातून उभा राहिला तो अरुण गवळी. आपल्यावर अन्याय होतो, मग गिरणी मालकाला मारलं पाहिजे, यातून गुन्हेगारी टोळीयुध्द सुरू झालं. यामध्ये अरुण गवळी, रामा नाईक खेचले गेले. रामा नाईक आधीपासूनचं गुन्हेगारी विश्वात होता. अरुण गवळीने स्वत:ची एक गँग उभी केली. (रमा नाईक हा स्मगलिंग आणि बाबू रेशीम हा दारूचा अड्डा चालवायचा.)

मुंबईत ज्यावेळी गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. त्यावेळी पगारवाढीसाठी असेल, एखाद्यावर अन्याय झाला असेल, तेव्हा गिरण्यांचे संप व्हायचे. संप फोडण्यासाठी गिरणी मालक ज्या लोकांना आणायचा, ते लोक मारामाऱ्या करायला चाळीत घुसायचे. सोडा वॉटरच्या बॉटल्स, दगडे घेऊन चाळीवर हल्ला चढवायचे. पण, चाळीचा मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर आतील कामगार, माणसं सुरक्षित राहायची. अनेक चाळींपैकी महत्त्वाच्या दगडी चाळीचा मुख्य दरवाजा इतर चाळींपेक्षा प्रशस्त होता. त्यामुळे त्यावेळी अरुण गवळीने कुठलेही गुन्हे केल्यानंतर किंवा त्याच्या साथीदारांना लपण्यासाठी ही दगडी चाळ सुरक्षित ठरली. अनेक गुप्त दरवाजे, खोल्या काढल्या गेल्या. अनेक खोल्या नव्याने बांधल्या गेल्या. या ठिकाणी लपून बसण्यासाठीची ही सुरक्षित जागा ठरली. 

अरुण गवळी – कामगार, आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन चाळीतचं!

गिरणी कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदारापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास या चाळीतचं झाला. या चाळीतूनचं डॉनची सूत्रे हालत होती. अनेक मारामाऱ्या, खून, खंडणीची प्रकरणे या चाळीतून घडली. अनेक नाट्यमय चकमकी चाळीत घडल्या. त्यामुळे दगडी चाळीची दहशत पसरली. (मुंबईमध्ये अनेक नामवंत इमारती आहेत, पण दगडी चाळ विशेष प्रसिध्द झाली.)

याचं चाळीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण चकमकी झाल्या. त्यामुळे संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरलं. तेथून जे अंडरवर्ल्डचं बस्तान होतं, ते हळूहळू कमी झालं. पण, तरीही दगडी चाळ ही 'दगडी चाळचं' राहिली. रोजचं गँगवॉर, पोलिसांशी होणारी चकमक हे आजही आठवून लोकांना आजही अंगावर शहारे येतात. इथे राहणारे लोक या घडामोडींचे साक्षीदार आहेत.  

जेव्हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर साळसकर अरुण गवळीला अटक करायला दगडी चाळीत घुसले, तेव्हा तेथे घडलेल्या प्रसंगामुळे दगडी चाळ अधिक प्रकाशझोतात आली. अरूण गवळी म्हटलं की 'दगडी चाळ आणि दगडी चाळ म्हटलं की अरुण गवळी' हे समीकरण ठरलं. विजय साळस्करांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती. गँगस्टर अमर नाईकला मारल्यानंतर गुन्हेगारांमध्ये साळसकरांची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. 

विजय साळसकर यांनी गवळीला अटक केल्यानंतर काही गँगस्टर दगडी चाळीत लपून बसण्यासाठी जाऊ लागले. तेव्हा दगडी चाळ कुप्रसिध्द झाली. त्याआधी 'खटाव मिल वाल्यांची चाळ' म्हणून 'दगडी चाळ' ओळखली जायची. खटाव नावाच्या मिलच्या मालकाची ही गिरणी होती. गिरण्यांचा संप झाल्यानंतर खटाव मिल मालकाचा खून झाला. खून करणारी जी मुले होती, त्या मुलांचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध नव्हता. पण, ही मुले दगडी चाळीतील होती. मिल बंद झाल्यानंतर मुले बेरोजगार होती, अनेकांच्या घरात खाण्याचे वांदे होते. त्यामुळे येथील जनजीवनचं विस्कळीत झालं होतं. १९८२ चा गिरणी संप झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले. त्याच्या अनेक केंद्रबिंदूपैकी एक केंद्रबिंदू होती 'दगडी चाळ'. त्यामुळे गुन्हेगारी जगताला मोठं वलय प्राप्त झालं, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. 

अरुण गवळीला सर्वात सुरक्षित ठिकाण ही चाळ होती. तो आमदार झाला तो या दगडी चाळीतचं! त्याच्या विरोधात त्यावेळी निवडणुकीला उभा राहिलेल्यांना प्रचंड दहशत निर्माण झाली होती. 

या चाळीतील नवरात्रौत्सवही मुंबईकरांना परिचित आहे. चाळीतील मंदिरामागे अरुण गवळीचं मोठं ऑफिसही होतं. नवरात्रौत्सवाचे पूजा तो मोठ्या थटात करायचा.   

दगडी चाळीचं चित्रपटसृष्टीलाही आकर्षण 

पूर्वी चित्रपटसृष्टीमध्ये गुन्हेगारी विश्वाचे चित्रण दाखवायला बहुतांशी मुंबईतील स्टुडिओमध्ये सेट उभारले जायचे. पण, ९० च्या दशकांनंतर काही दिग्दर्शकांनी सेट प्रत्यक्ष लावण्याऐवजी 'दगडी चाळी'मध्ये जाऊन शूटिंग करायला सुरुवात केली. (ते ही गुन्हेगारी विश्वाचा बोलबाला असताना रिस्क घेऊन दिग्दर्शक तिथे चित्रीकरणासाठी जायचे.) 

विविध दिग्दर्शकांनी आपल्याकॅमेरामॅनच्या साथीने या दगडी चाळीच वेगळ्या पध्दतीने चित्रीकरण केले आणि मोठ्या पडद्यावर दाखवले. त्यामुळे प्रेक्षकांनाही 'दगडी चाळ' काय आहे, हे कळलं. अनेक गुन्हेगारी विश्वावरील सिनेमांचे शूटिंग हे दगडी चाळीत केलं गेलं. त्यामुळे दगडी चाळीला विशेष महत्त्व आलं. 

अरुण गवळीवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, अर्जुन रामपाल अशा कलाकारांनी गवळीची भूमिका साकारली. 'दगडी चाळ', 'डॅडी', 'शूट आऊट ॲट लोखंडवाला', 'एक थी बेगम' अशा सिनेमा आणि वेब सीरीजमधून अरुण गवळीची व्यक्तीरेखा साकारणारे कलाकार छोट्या-मोठ्या भूमिकेत सतत डोकावताना प्रेक्षकांना पहायला मिळतात. 

अरुण गवळीच्या मुलीचं अभिनेत्याशी लग्न 

गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी लग्न केले. योगिता ही सिनेनिर्माती असून तिने दगडी चाळ या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच ती एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. शिवाय ती नगरसेविकाही होती. तर अक्षय वाघमारे ('यूथ' फेम) हा आघाडीचा अभिनेता मूळचा पुण्याचा आहे.

मुंबईत मोठमोठ्या वास्तू या जतन केल्या जातात. आलेल्या पिढीला आणि तेथून लहानाच्या मोठ्या झालेल्या पिढीला, ज्यांनी दगडी चाळ पाहिली आहे, त्यांच्यासाठी ही एक केवळ आठवण म्हणून राहील. दगडी चाळीच्या जागी गगनचुंबी इमारत उभी राहिलही; पण त्याची आठवण आता ही केवळ सिनेमाच्या इतिहासामध्ये मर्यादित राहील.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news