DA Hike : खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ जाहीर, सरकारी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट

मासिक वेतनावर कसा होणार परिणाम?
DA Hike : खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ जाहीर, सरकारी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या सहामाहीसाठी महागाई भत्त्यात (DA) होणाऱ्या वाढीची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. या प्रतीक्षेदरम्यान केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील (CPSE) अधिकारी आणि बिगर-युनियन पर्यवेक्षकांसाठी (Non-Union Supervisors) एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने (DPE) औद्योगिक महागाई भत्त्याचे (IDA) नवीन दर जाहीर केले आहेत. वाढत्या महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी या भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून, यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात घसघशीत वाढ होणार आहे.

काय आहेत औद्योगिक महागाई भत्त्याचे नवीन दर?

शासकीय अधिसूचनेनुसार, भत्त्याचे हे नवीन दर १९८७, १९९७, २००७ आणि २०१७ या वेतनश्रेणीअंतर्गत येणाऱ्या सीपीएसई (CPSE) कर्मचाऱ्यांना लागू होतील. २०१७ च्या वेतनश्रेणीनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५५.७ टक्के झाला आहे. तसेच २००७ आणि १९९७ च्या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी हा भत्ता अनुक्रमे २४१.७ टक्के आणि ४७६.९ टक्के निश्चित करण्यात आला आहे.

याशिवाय, १९८७ च्या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) ९,८५४ या सरासरीवर आधारित १८,२९८ रुपयांचा औद्योगिक महागाई भत्ता निश्चित करण्यात आला आहे. या वाढीव भत्त्याचा लाभ ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, पायाभूत सुविधा, उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), पोलाद, कोळसा, ऊर्जा आणि वित्तीय सेवा यांसारख्या विविध सरकारी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि बिगर-युनियन सुपरव्हायझर्सना मिळणार आहे.

मासिक वेतनावर कसा होणार परिणाम?

महागाई भत्त्यातील या वाढीचा थेट सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातातील वेतनावर (In-Hand Salary) होणार आहे. उदाहरणार्थ, २०१७ च्या वेतनश्रेणीतील एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (Basic Pay) ५०,००० रुपये असल्यास, ५५.७ टक्के या नवीन आयडीए (IDA) दरानुसार त्याला महागाई भत्ता म्हणून २७,८५० रुपये मिळतील. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनानुसार ही मिळणारी रक्कम भिन्न असेल.

काय असतो औद्योगिक महागाई भत्ता (IDA)?

औद्योगिक महागाई भत्ता (IDA) हा वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावर होणारा परिणाम रोखण्यासाठी दिला जाणारा एक महत्त्वाचा भत्ता आहे. याची गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) आधारे केली जाते. बाजारात महागाई वाढल्यावर कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता टिकून राहावी या उद्देशाने 'आयडीए'मध्ये वेळोवेळी वाढ केली जाते.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणे अद्याप बाकी असून, जुलै ते डिसेंबर या सहामाहीसाठी ही वाढ सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांची वाढ करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. जर ही वाढ झाली, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून थेट ६३ किंवा ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news