पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी आदळले. (Cyclone Fengal) ताशी 90 किमी वेगाने किनारपट्टीवर आदळल्यानंतर फेंगलचा वेग हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, चेन्नईत पावसावेळी वेगवेगळ्या वीज कोसळून तीन जण ठार झाले आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये ४४ सेंटीमीटर पाऊस झाला असून, मागील ३० वर्षातील रेकॉर्ड मोडले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचे अतिरिक्त महासंचालक एस बालचंद्रन यांनी सांगितले की, फेंगल पुद्दुचेरीजवळ स्थिर आहे आणि पुढील तीन तासांत ते हळूहळू कमकुवत होईल. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी तामिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीवर कोसळले. चेन्नई जवळपासचे जिल्हे आणि पुद्दुचेरीला पावसाने झोडपले. चक्रीवादळामुळे 16 तास बंद असलेले चेन्नई विमानतळ आज (दि. १) पहाटे पुन्हा सुरू झाले आहे.
हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर स्थिर राहिले आणि पुढील सहा तासांत ते कमकुवत होऊ शकते, असे आयएमडीने म्हटले आहे. चक्रीवादळ फेंगल गेल्या सहा तासांत स्थिर राहिले आणि ते पश्चिमेकडे अतिशय मंद गतीने सरकण्याची शक्यता आहे.
पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशसह तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील मैलममध्ये 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 ते रविवारी पहाटे 5.30 दरम्यान 50 सेमी पावसाची नोंद झाली, तर पुद्दुचेरीमध्ये 46 सेमी पावसाची नोंद झाली. फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीत मागील ३०वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.चक्रीवादळाच्या प्रभावाने आंध्र प्रदेशातील नेल्लोर, चित्तूर, विशाखापट्टणम आणि तिरुपतीला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे मुसळधार पाऊस पडत आहे. ताशी 50-60 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. १ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
रविवारी बंद करण्यात आलेले चेन्नई विमानतळावरील कामकाज मध्यरात्री पुन्हा सुरू झाले. अनेक उड्डाणे रद्द झाली असली तरी अनेकांनी उशिराने उड्डाण केले.