

अमरावती/विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून, त्याच्या वाऱ्याचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी यानम किनारपट्टीवर ते धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १३० ते १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
बुधवारी सकाळी ५ वाजता हे चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून ६१० किलोमीटर, तर चेन्नईपासून ५८० किलोमीटर अंतरावर होते. समुद्रात १४ मीटरपेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठ राज्यांमध्ये पावसाचा इशारा
आंध्र प्रदेश आणि ओडिशासह तेलंगणा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या आठ राज्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात १९ आणि २० नोव्हेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला असून, एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफची ११ पथके तैनात केली आहेत. ओडिशात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही जोरदार पाऊस व सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तेलंगणात २० आणि २१ नोव्हेंबरला अतिवृष्टीचा इशारा आहे. पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्येही काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
विशाखापट्टणमसह किनारपट्टीवरील भागांत समुद्राला उधाण आले आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवल्या आहेत. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनाही पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ओडिशातील ५५ गावांना भूस्खलनाचा धोका
चक्रीवादळाचा मोठा फटका ओडिशालाही बसण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन ५५ गावांची ओळख पटवली आहे. या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमधील ८७ ब्लॉकमध्ये १,९०२ संवेदनशील ठिकाणे निश्चित केली आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ३,३२९ मदत छावण्या तयार ठेवल्या आहेत. मुसळधार पावसाचे पाणी साठवण्यासाठी हरभंगी आणि बदनाला धरणांतून पाणी सोडले जात आहे.