

पुढारी ऑनलाईन डेस्क : "सध्याच्या काळात कामकाजाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांमध्ये जवळीक निर्माण होते. कधीकधी संमतीने लैंगिक संबंधही निर्माण होतात. मात्र दोघांमधील संबंधात बिघाड आला की, बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. म्हणून महिलेवर होणारा बलात्कार आणि संमतीने प्रस्थापित होणारे लैंगिक संबंध यात फरक करणे महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर करताना नोंदवले.
एका खासगी कार्यालयात काम करणार्या तरुण-तरुणीची ओळख झाली. काही दिवसांमध्येच या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अनेक महिने दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. या काळात त्यांच्या शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. मात्र काही दिवसानंतर तरुणाचे अन्य ठिकाणी संबंध असल्याचे तरुणीच्या निदर्शनास आले. तिने त्याच्याशी संबंध तोडले. यानंतर बलात्काराची तक्रार दाखल केली. या प्रकरणी मे २०२४ मध्ये तरुणाला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्याने जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.
बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, "सध्याच्या काळात, कामाच्या ठिकाणी जवळीक कधीकधी संमतीने होणारे संबंध निर्माण हाेतात. संबंधात बिघाड आला की बलात्काराची तक्रार दाखल केली जाते. म्हणून, बलात्काराचा गुन्हा आणि दोन प्रौढांमधील संमतीने होणारे लैंगिक संबंध यांच्यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते."
"कामकाजाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे कायदेमंडळाचे कर्तव्य आहे; परंतू पहारेकरी म्हणून राहणे आणि त्याचा गैरवापर रोखणे हे न्यायालयासमोर कठीण आव्हान आहे," असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील संशयित आरोपी आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी काम करत हाेते. यातून त्याच्यात लैंगिक संबंध प्रस्थापित झाले हाेते; परंतु सुमारे एक वर्षानंतर त्यांचे संबंध बिघडले यानंतर तरुणीने बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील आरोपीस मे २०२४ मध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावरील आरोपही निश्चित झाले आहेत. आता आरोपांची सत्यता खटल्यादरम्यान तपासावी लागेल, यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे संशयित आरोपीला बराच काळ तुरुंगात ठेवण्यात फायदा नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.