

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नानंतर पत्नीचे तिच्या मित्रासोबतचे अश्लील चॅटिंग पती सहन करु शकणार नाही, असे निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नोंदवले. जर आक्षेप असूनही, पती अथवा पत्नी अशा कृती करत राहिले तर निश्चितच ते दुसऱ्या जोडीदारासाठी मानसिक क्रूरता ठरेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलिकडेच एका महिलेने तिच्या पतीच्या घटस्फोटाच्या अर्जाला परवानगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले. कौटुंबिक न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला होता. या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती विवेक रुशिया आणि न्यायमूर्ती सिंह यांच्या खंडपीठाने लग्नानंतर पती किंवा पत्नी त्यांच्या मित्रांसोबत अश्लील चॅटिंग करू शकत नाहीत, असे म्हटले आहे.
कोणताही पती त्याची पत्नी मोबाईलवर अश्लील चॅटिंग करत आहे हे सहन करणार नाही. लग्नानंतर पती-पत्नीला त्यांच्या फोनवर कोणाशीही गप्पा मारण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु ते कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या बोलण्याची पातळी सभ्य असली पाहिजे. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, जेव्हा एक महिला एखाद्या पुरूषाशी बोलत असते किंवा एक पुरूष एखाद्या स्त्रीशी बोलत असते तेव्हा तुमच्या संभाषणाची पातळी अधिक सभ्य असली पाहिजे. तुमचे शब्द असे असले पाहिजेत की तुमच्या जोडीदाराला त्यावर कोणताही आक्षेप नसावा. जर आक्षेप असूनही, पती किंवा पत्नी अशा गोष्टी बोलत राहिले तर ते निश्चितच दुसऱ्या जोडीदारासाठी मानसिक क्रूरतेला कारणीभूत ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या पती-पत्नीचे लग्न २०१८ मध्ये झाले. नवरा काही प्रमाणात बहिरा आहे. पत्नीला लग्नाआधीच हे माहित होते. पतीचा आरोप आहे की लग्नानंतर पत्नीने त्याच्या आईशी वाईट वागायला सुरुवात केली. लग्नानंतर दीड महिन्यातच ती सासरच्या घरातून निघून गेली. पतीने आरोप केला होता की त्याची पत्नी तिच्या पुरुष मित्रांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत होती. मित्रांशी पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांबद्दल फोनवर गप्पा मारत होती. पत्नीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पतीने तिचा फोन हॅक केला होता. तिच्याविरूद्ध पुरावे गोळा करण्यासाठी अश्लील संदेश इतर लोकांना पाठवले होते. पतीने तिच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले, असा आरोप पत्नीने केला. दरम्यान, न्यायालयाला असे आढळून आले की, महिलेच्या वडिलांनी स्वतः कबूल केले होते की त्यांच्या मुलीला इतर मित्रांशी बोलण्याची सवय होती.