

नवी दिल्ली : देशातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक आयआयटी मद्रासमध्ये तयार झाला आहे. या ट्रॅकचे अंतर ४१० मीटर एवढे आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमातून या ट्रॅकच्या पूर्णत्वाची घोषणा केली. यासोबत त्यांनी या चाचणी ट्रॅकचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
यावेळी वैष्णव म्हणाले की, भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्ण झाला असुन हा प्रकल्प आयआयटी मद्रासच्या आविष्कार हायपरलूप टीमने भारतीय रेल्वे आणि टीयुटीयु या स्टार्टअपच्या सहकार्याने विकसित केला आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास आल्यास मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ केवळ २५ मिनिटांवर येऊ शकतो.
देशात जलद वाहतूक तंत्रज्ञानात नवा अविष्कार हायपरलूप तंत्रज्ञानामुळे घडणार आहे. आयआयटी मद्रासमध्ये हायपरलुप चाचणीसाठी पहिला ट्रॅक विकसित करण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास ६०० किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास होऊ शकतो.
भारतातील पहिली हायपरलूप ट्रेन मुंबई-पुणे दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ केवळ २५ मिनिटांवर येऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. भारतातील वाहतूक तंत्रज्ञानात या प्रकल्पामुळे नवा अविष्कार येऊ शकतो. मात्र चाचणी फेरीत असलेला हा प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य बनवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
हायपरलूप एक असे तंत्रज्ञान आहे जे एका विशेष कॅप्सूल किंवा पॉड्समधून वाहतूक करते. स्टीलच्या नळ्याद्वारे ६०० ते १२०० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने चुंबकाद्वारे हे कॅप्सूल चालविले जाते.