

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आपली कर्तव्ये पार पाडण्यासह लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानदिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात एका भावनिक पत्राद्वारे मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. दरम्यान, यावेळी संविधान दिनानिमित्त मराठीसह 9 भाषांमध्ये मोदी यांच्या हस्ते संविधान प्रकाशित करण्यात आले.
आपल्या पत्रात पंतप्रधानांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या स्वीकृतीचे स्मरण केले आणि भारताच्या विकासात व प्रगतीत संविधानाच्या चिरस्थायी भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की, आज घेतलेले निर्णय आणि लागू केलेली धोरणेच भावी पिढ्यांचे जीवन घडवतील आणि एक विकसित व सशक्त भारत निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. शाळा आणि महाविद्यालयांनी 18 वर्षे पूर्ण करणार्या नवमतदारांचा सन्मान करून संविधान दिन साजरा करावा, जेणेकरून तरुण नागरिकांना राष्ट्र उभारणीतील त्यांच्या भूमिकेसाठी प्रोत्साहन मिळेल. 2014 मध्ये आणि पुन्हा 2019 मध्ये निवडणुकीच्या निकालानंतर संसदेत पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला वंदन केले होते, जे राष्ट्राच्या या पायाभूत दस्तावेजाबद्दलचा त्यांचा नितांत आदर दर्शवते.
संविधान हा भारताचा गौरव : राष्ट्रपती मुर्मू
संविधान हे देशाच्या ओळखीचा आधारस्तंभ आहे, तसेच वसाहतवादी मानसिकता सोडून राष्ट्रवादी विचार स्वीकारण्यासाठी एक मार्गदर्शक दस्तावेज आहे, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. भारत जगासमोर विकासाचे एक नवीन मॉडेल सादर करत आहे आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आपले संविधान हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. ते राष्ट्राच्या ओळखीचा दस्तावेज आहे. हे वसाहतवादी मानसिकता सोडून राष्ट्रवादी द़ृष्टिकोन स्वीकारून देशाला पुढे नेणारा दस्तावेज आहे. आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे त्या म्हणाल्या.