.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सुरत; वृत्तसंस्था : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केल्याच्या आरोपातून सुरत सत्र न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली. संमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणे हा बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने निकालात दिला. पीडितेने कोणत्याही दबावाशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये आरोपीसोबत स्वतःचे ओळखपत्र दिले होते, त्यामुळे तिच्यासोबत कोणतीही जबरदस्ती झाली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीसोबत लग्न होऊ शकत नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही पीडितेने शारीरिक संबंध सुरू ठेवले, असेही न्यायालयाने नमूद केले.
तक्रारीनुसार, सुरतच्या डिंडोली परिसरात राहणारा आरोपी एमटेकचे शिक्षण घेत होता. यादरम्यान त्याची ओळख पीडित तरुणीशी झाली. इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आरोपीने लग्नाचे वचन दिले होते; परंतु नंतर त्याने नकार दिला. यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. सुमारे तीन वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला.
न्यायालयातील सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले, ज्यामुळे खटल्याची दिशा बदलली. पीडिता आणि आरोपीने शेवटचे शारीरिक संबंध 6 फेब्रुवारी 2022 रोजी ठेवले होते. त्यानंतर 8 जून 2022 रोजी पीडितेने एका मेडिकल स्टोअरमधून औषध आणून घरीच गर्भपात केला होता. बचाव पक्षाचे वकील अश्विन जोगडिया यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, इतर वैद्यकीय पुराव्यांबरोबरच, डीएनए अहवालही पीडिता आणि आरोपीच्या नमुन्यांशी जुळत नाही.