पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती संधीसाधू आहे. ती राज्यातील जनतेसाठी हितावह नाही. नितीश कुमार यांना केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा मोह आहे. त्यामुळेच जद(यू) प्रमुखांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणीशी हातमिळवणी केली आहे," असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते आज (दि.२०) बक्सर येथील पक्षाच्या 'जय बापू, जय भीम, जय संविधान' सभेला संबोधित करत होते.
बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुकीत एनडीए सरकारला सत्तेवरून काढून टाकले पाहिजे, असे आवाहन करत यावेळी खर्गे म्हणाले की, बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांना विचारावे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ऑगस्ट २०१५ रोजी बिहारसाठी १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या आश्वासनाचे काय झाले?, अशी टीकाही त्यांनी केली. संसदेने मंजूर केलेले वक्फ (दुरुस्ती) विधेयक हे भाजप आणि आरएसएसचे समुदायांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच दाखल केलेल्या आरोपपत्रावर खर्गे म्हणाले, "काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी हे केले गेले आहे. आमचे नेते घाबरू शकत नाहीत." इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले प्राण दिले आहेत. आरएसएस आणि भाजप "समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणाच्या बाजूने नाहीत. ते गरीब, महिला आणि समाजातील कमकुवत घटकांच्या विरोधात आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी विचार करू शकत नाहीत. ते जाती आणि धर्माच्या आधारे समाजाचे विभाजन करण्यावर विश्वास ठेवतात”, असा दावाही त्यांनी केला.