

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात सध्या सत्य आणि सत्ता यांच्यात संघर्ष सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्तेपुढे सत्याचे महत्त्व वाटत नाही. मात्र, सत्याच्या जोरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा आणि रा. स्व. संघाला सत्तेवरून खाली खेचू, असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ‘व्होट चोर-गद्दी छोड’ आंदोलनादरम्यान रामलीला मैदानावर काँग्रेस कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.
राहुल गांधी म्हणाले, जगातील प्रत्येक धर्माची शिकवण सांगते की, सत्य सर्वात महत्त्वाचे आहे. गांधीजींनीही सत्यालाच सर्वोच्च स्थान दिले; पण रा. स्व. संघाची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्यासाठी सत्य नाही, सत्ता महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी अंदमान-निकोबारमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला.
राहुल गांधी म्हणाले, अंदमान-निकोबारमध्ये मोहन भागवत म्हणाले की, ‘जग सत्य पाहत नाही, शक्ती पाहते; ज्याच्याकडे शक्ती आहे, त्यालाच मान दिला जातो.’ हीच संघाची विचारधारा आहे. त्यांच्या मते, सत्याला काहीच किंमत नाही, फक्त सत्ता महत्त्वाची आहे. भारताची संस्कृती आणि सर्व धर्मांची मुळे सत्यावर आधारित आहेत. सत्यम्-शिवम्-सुंदरम् हीच आपल्या देशाची ओळख आहे, असे राहुल म्हणाले.
सत्याच्या बळावर मोदी सरकार हटवू
राहुल गांधी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत म्हणाले, सभागृहात माझ्या प्रश्नांवर अमित शहा यांचे हात थरथरत होते. सत्तेत असतानाच ते धाडसी असतात; सत्ता गेली की, त्यांचे धाडसही संपेल.
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. माझ्या प्रश्नांना आयोगाने उत्तर दिले नाही. आयोग असत्याच्या बाजूने उभा आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा बदलला आणि निवडणूक आयुक्त काहीही करतील, तरी त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही, अशी तरतूद करण्यात आली. आम्ही सत्तेत आल्यावर हा कायदा बदलू आणि तुमच्यावर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रियांका गांधींचे भाजपला थेट आव्हान
यावेळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, संसदेत राष्ट्रगीतावर चर्चा होते; पण बेरोजगारी, महागाई, पेपर लीक यावर बोलण्याची हिंमत नाही. मी भाजपला आव्हान देते की, एकदा बॅलेट पेपरवर निष्पक्ष निवडणूक लढवून दाखवा; आपण जिंकू शकणार नाही, हे भाजपलाही माहीत आहे. इतिहासात प्रथमच संपूर्ण विरोधक एकत्र येऊन निवडणूक आयोगावर विश्वास उरलेला नसल्याचे सांगत आहेत. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा संशयास्पद बनवण्यात आला आहे. आज देशातील प्रत्येक संस्था मोदी सरकारसमोर झुकवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
खर्गे यांची मोदींवर टीका
सत्ता आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्व टिकून आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांचे नामोनिशाण राहणार नाही. माझ्या मुलावर आठ तासांची शस्त्रक्रिया होणार आहे; पण या आंदोलनात उतरलेल्यांना सोडून मी जाऊ शकत नाही. आपल्याला मिळालेल्या मतांच्या अधिकार हिरावून घेतला तर काय करायचे, असा सवाल खर्गे यांनी केला.