

Congress Office Row
नवी दिल्ली :२४, अकबर रोड येथील आपले पक्षाचे कार्यालय शनिवारपर्यंत रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी आज दिली आहे. येथे गेल्या ४८ वर्षांपासून काँग्रेसचे मुख्यालय आहे. गेल्या वर्षी काँग्रेसने कोटला मार्ग येथे 'इंदिरा भवन' या आपल्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले होते. मात्र, त्यानंतरही पक्षाचे कामकाज तिथूनच सुरू आहे.
केवळ मुख्य कार्यालयच नव्हे, तर ५, रायसीना रोड येथील भारतीय युवा काँग्रेसचे कार्यालयही रिकामे करण्यास पक्षाला सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कायदेशीर मार्ग शोधून काही दिलासा मिळवता येईल का, याचा विचार काँग्रेस पक्ष करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.गेल्या वर्षी जेव्हा सोनिया गांधी यांनी नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले होते, तेव्हा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी २४, अकबर रोड येथील कार्यालयाशी असलेले आपले भावनिक नाते कायम राहील, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला २४, अकबर रोड येथील हा बंगला म्यानमारच्या भारतातील राजदूत डॉ खिन की यांचे निवासस्थान होता. त्यांच्या कन्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आँग सान सू क्यी यांनीही काही वर्षे याच घरात घालवली होती. या बंगल्याच्या इतिहासातील सर्वात सुवर्णकाळ १९७० च्या उत्तरार्धात सुरू झाला. १९७७ च्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा गांधी यांनी एका गटाचे नेतृत्व केले आणि त्यांना कामासाठी जागेची गरज होती. त्यावेळी इंदिरा गांधींचे निष्ठावंत राज्यसभा खासदार जी. व्यंकटस्वामी यांनी आपला अकबर रोडवरील बंगला देऊ केला.हाच बंगला पुढे काँग्रेसच्या जोरदार पुनरागमनाचा साक्षीदार ठरला. राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही हेच काँग्रेसचे मुख्यालय होते.
काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, "आमच्या २४ अकबर रोडवरील कार्यालयाला आणि युवक काँग्रेसच्या कार्यालयाला नोटीस मिळाली आहे. आज संपूर्ण देशाची प्राथमिकता काय आहे? देशाची प्राथमिकता ही आहे की, लोकांना एलपीजी (LPG) च्या रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये, काळ्या बाजारातून खरेदी करण्याची वेळ येऊ नये, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा बोजा अंगावर पडू नये; पण सर्व मुद्द्यांवरून लक्ष भरकटवणे ही सरकारची प्राथमिकता बनली आहे. विरोधक हे मुद्दे मांडू शकणार नाहीत, प्रश्न विचारू शकणार नाहीत, पत्रकार परिषद घेऊ शकणार नाहीत आणि आमच्या युवक काँग्रेसने ज्याप्रमाणे आंदोलन केले, तसे आंदोलन करू शकणार नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तुम्ही काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत राहिल, असेही त्यांनी सांगितले.