

नवी दिल्ली: २०२१ च्या जनगणनेला झालेल्या विलंबाच्या मुद्द्यावर काँग्रेसने चर्चेची मागणी केली. यासाठी पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद मणिकम टागोर यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आणि तातडीने चर्चेची मागणी केली. याशिवाय केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या हिबी इडन यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला.
तामिळनाडूमधील विरुधनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभा महासचिवांना पत्र लिहून कामकाज तहकूब करण्याची नोटीस दिली होती. यामध्ये जनगणना आणि महिला आरक्षण हे दोन महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. २०२१ च्या जनगणनेला उशीर झाल्यामुळे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीलाही विलंब होत असल्याचेही ते म्हणाले..
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आवाहनानुसार, जात-आधारित घटकासह जनगणना आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यावे आणि जलद गती द्यावी, असे आवाहन टागोर यांनी सरकारला केले.
केरळच्या एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघाचे खासदार हिबी इडन यांनी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनाच्या घटनेवर चर्चेची मागणी करत स्थगन प्रस्ताव मांडला. सरकारने शक्य तेवढ्या तातडीने भूस्खलनग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.