

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टिपणीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या विरोधी पक्ष भाजपावर चांगलेच तोंडसूख घेत आहेत. आता याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इंदिरा गांधी यांच्या एका मुलाखतीचा आहे.
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी हा व्हिडीओ शेअर करत ‘कॉंग्रेसला त्यांचा भूतकाळ चांगलाच माहित आहे’ अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये इंदिरा गांधी या आणिबाणीच्या काळातील कारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या जस्टिस शहा कमिशनवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्या या व्हिडीओमध्ये म्हणतात की ‘ शहा यांना राजकीय वर्तुळात काय चालले आहे याची जाण आहे का ? विकसनशील अर्थव्यवस्था नष्ट करू इच्छिणाऱ्या कोणत्या शक्ती कार्यरत आहेत? न्यायाधीश हे ठरवण्यास सक्षम आहे का? न्यायाधिशच हे ठरवतील मग लोकशाही कशासाठी ? निवडणूका कशासाठी आणि ताकदवान लोक सत्तेत का ? असे अनेक प्रश्न इंदिरा गांधी यांनी या मुलाखतीत विचारले आहेत.
हे शहा कमिशन जनता पार्टी सरकारने आणिबाणीत झालेल्या सत्तेचा दुरुपयोग आणि कायद्याची पायमल्ली याची चौकशी करण्यासाठी नेमला होता. शहा कमिशनने आणिबाणीच्या २१ वर्षाच्या काळात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याची कशी गळचेपी झाली याचा विस्तृत अहवाल मांडला होता.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सरन्यायाधिश यांच्यावर टिपण्णी केली होती. देशात धार्मिक दंगली घडवण्यात सर्वोच्च न्यायालय कारणीभूत आहे असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे विरोधीपक्षाने टीकेची झोड उठवली होती. आता याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.