

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला धरणे देण्याचा अधिकार आहे मात्र जमीन आणि पैसे लुटण्याचा नाही, अशी खोचक टीका भाजपने काँग्रेसवर केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेसने देशभर ईडी कार्यालयांबाहेर सरकारचा निषेध केला. याच मुद्द्यावरुन भाजपने काँग्रेसवर हल्ला चढवला. (National herald case)
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसवर हल्ला चढवत ते म्हणाले की, काँग्रेस अस्वस्थ आहे. ते देशभर निदर्शने करत आहेत. नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडिया लिमिटेडबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी पक्षाच्या निधीचा गैरवापर केला. नॅशनल हेराल्ड प्रकरण हे एक कॉर्पोरेट षडयंत्र आहे. २००८ मध्ये नॅशनल हेराल्डचे प्रकाशन बंद करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसने नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल लिमिटेडला ९० कोटी दिले.
एक राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा निधी एखाद्या खाजगी संस्थेला देऊ शकत नाही. मात्र महत्वाची मालमत्ता आपल्या कुटुंबाकडे परत यावी म्हणून हे कॉर्पोरेट षडयंत्र रचण्यात आले. यंग इंडिया लिमिटेडमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी ७६ टक्के भागधारक आहेत. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाखालील मालमत्ता यंग इंडिया लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आल्या. यंग इंडियाला पैसे हस्तांतरित केल्यानंतर गांधी कुटुंबीयांनी काही मालमत्ता मिळाल्या, असाही दावा केला.
नॅशनल हेराल्डच्या इतिहासावर बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, सुरुवातीला ज्या पद्धतीने लोकांकडून नॅशनल हेराल्डसाठी पैसे गोळा केले जात होते, हे योग्य नसून चिंताजनक आहे, असे मत सरदार वल्लभभाई पटेलांचे होते. तर देशाचा आवाज म्हणून बनलेले वृत्तपत्र केवळ नेहरू आणि कुटुंबाचा आवाज बनून राहिल्याचे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रभानू गुप्ता म्हणाले होते, असा दावाही भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला.