

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील गोंधळाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उत्तर मिळाल्यानंतर काँग्रेसने जोरदार पलटवार केला. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. निवडणूक आयोगाने इतर कुठून तरी मार्गदर्शन घेण्याऐवजी संविधानाने दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी शुक्रवारी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तुमचे उत्तर मिळाले आहे. या उत्तरात निवडणूक आयोगाने स्वतःला 'क्लीन चिट' दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सूरावर काँग्रेसने तीव्र आक्षेप व्यक्त केला. काँग्रेसने लिहिले की, निवडणूक आयोगाला कोण सल्ला किंवा मार्गदर्शन देत आहे हे माहीत नाही. परंतु आयोगाने हे विसरलेले दिसते की ही एक राज्यघटनेनुसार स्थापन झालेली संस्था आहे आणि काही महत्त्वाची 'प्रशासकीय आणि अर्ध-न्यायिक' कार्ये सोपवण्यात आली आहेत. आयोगाने एखाद्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाला ऐकण्याची संधी दिली किंवा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे सद्भावनेने परीक्षण केले तर तो अपवाद किंवा 'सवलत' नाही. हे एक कर्तव्य आहे जे आयोगाने पार पाडणे आवश्यक आहे.
काँग्रेसने आपल्या पत्रात असेही लिहिले आहे की, निवडणूक आयोगाचे प्रत्येक उत्तर आता वैयक्तिक नेत्यांवर किंवा पक्षावर वैयक्तिक टीकेने प्रभावित दिसते. काँग्रेसने निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले की, त्यांच्या उत्तरात वापरलेला शब्द काढून टाकला नाही, तर पक्ष कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास मागेपुढे पाहणार नाही. यंत्रांच्या बॅटरीमधील चढ-उताराच्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट करण्याऐवजी निवडणूक आयोगाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे काँग्रेसने आपल्या पत्रात लिहिले आहे. काँग्रेसने काही यंत्रांबाबत विशिष्ट तक्रारी केल्या होत्या आणि त्यावरही असेच स्पष्टीकरण यायला हवे होते. पण निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया सामान्य होती.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी 'एक्स'वर पोस्ट करून निवडणूक आयोगाला फटकारले. जयराम रमेश यांचे पत्र ट्विट करत त्यांनी लिहिले की, जर पंतप्रधान स्वत:ला देव मानत असतील तर त्यांचे मुख्य निवडणूक आयुक्तही स्वत:ला मानवजातीसाठी देवाची देणगी असल्याचे स्पष्टपणे समजतील.