दिल्लीत प्रचारादरम्यान एकाने कन्हैयाकुमारांच्या कानशिलात लगावली

कन्हैयाकुमार यांना कानशिलात मारल्यानंतर संशयिताला कार्यकर्त्यांनी मारहाण केली
कन्हैयाकुमार यांना कानशिलात मारल्यानंतर संशयिताला कार्यकर्त्यांनी मारहाण केली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीच्या उत्तर पूर्व मतदारसंघातील काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांना गर्दीत एकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजधानी दिल्लीतील सर्व ७ जागांवर सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जोरात प्रचार सुरू असतानाच उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार यांना गर्दीतील एका व्यक्तीने हार घालण्याच्या बहाण्याने जवळ येऊन मारहाण केली. त्याने कन्हैयाकुमार यांच्यावर शाई सुद्धा फेकली. मात्र, सुदैवाने यामध्ये त्यांना कुठलीही इजा झाली नाही. कन्हैयाकुमार यांच्या समर्थकांनी त्या व्यक्तीला वेळीच पकडून चांगला चोप दिला.

कन्हैयाकुमार शुक्रवारी, रात्री उशिरा  'आप'च्या कार्यालयात एका बैठकीसाठी पोहोचले होते. बैठक झाल्यावर कन्हैयाकुमार 'आप'च्या नगरसेवकांसोबत बाहेर पडले असताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांना गराडा घातला. गर्दीतील काही लोकांनी कन्हैया कुमार यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. त्यावेळी मारहाणीची ही घटना घडली. भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी पराभवाच्या   भीतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला आहे.

या घटनेतील व्यक्तीने कन्हैया कुमार यांना मारण्याचे कारण सांगण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये  "भारत तेरे टूकडे होंगे" हा नारा देणाऱ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या तोंडावर मारून प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत आमच्यासारखे सनातनी सिंह जिवंत आहेत, तोपर्यंत भारताचे कोणी तुकडे करू शकत नाही," असेही त्याने व्हिडीओत म्हटले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news