नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरचे (नोएडा) जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांच्या नावाने राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टचा स्क्रीन शॉट काँग्रेसने शेअर केला आणि भाजपसह उत्तर प्रदेश सरकारकडून उत्तर मागितले आहे. तसेच या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या निमित्ताने काँग्रेसने भाजपवर अधिकाऱ्यांचे राजकीयीकरण केल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर म्हणाले की, नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या 'एक्स' हँडलवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यावर चुकीची आणि अस्वीकार्य टिप्पणी करण्यात आली आहे. तसेच हा काही नवीन प्रकार नसुन गेल्या दहा वर्षात भारतातील अधिकारी वर्ग आणि इतर गैर-राजकीय अधिकाऱ्यांचे राजकीयीकरण वाढले आहे. ज्या नागरी सेवेला सरदार पटेलांनी एकेकाळी भारताची पोलादी चौकट म्हटले होते, ती आता दडपून कमकुवत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. नोएडा जिल्हाधिकाऱ्यांच्या टीपण्णी सारखी प्रकरणे याची ताजी उदाहरणे आहेत. ज्या अधिकाऱ्याने अशी टीपण्णी केली त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही जयराम रमेश म्हणाले. अशाच आशयाची पोस्ट काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी केले आहे.
हा संपूर्ण वाद समोर आल्यानंतर नोएडाचे जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांनी यावर स्पष्टीकरण दिले. काही समाजकंटकांनी माझ्या ओळखीचा गैरवापर करून माझ्या अधिकृत सोशल मीडिया 'एक्स' हँडलवरून चुकीची टीपण्णी केली. नोएडाच्या सेक्टर २० पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी 'एक्स'वर एका इतिहासकाराशी संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ते म्हणाले होते, 'इतिहास बदलता येत नाही. इतिहास घडवला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहास कसा लक्षात ठेवेल हे त्यांना माहीत आहे आणि त्यामुळेच ते चिंतेत आहेत.’ याला प्रत्युत्तर म्हणून नोएडाचे जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांच्या अधिकृत सोशल मीडिया 'एक्स' वरून ‘अरे, तुमचा आणि तुमच्या पप्पूचा विचार करा’ अशी पोस्ट करण्यात आली होती. यानंतर चांगलाच गदारोळ झाला. मात्र नंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आली.