

कोलकाता; वृत्तसंस्था : बंगालमध्ये भाजपची त्सुनामी दिसून येत आहे. मोठ्या फरकाने आमच्या जागा वाढतील. इतर राज्यांमध्ये आम्ही थेट सत्ता मिळवतो; पण बंगालमध्ये आम्ही संघर्ष करत 77 जागांपर्यंत पोहोचलो आहोत. आता येथेही भाजप सरकार स्थापन करणार, हे निश्चित आहे. पुढील मुख्यमंत्री स्थानिकच असेल; पण तो दीदींचा भाचा नसेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. कोलकाता येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहा म्हणाले, राज्यातील ‘भतीजा टॅक्स’ आणि सिंडिकेट संस्कृतीमुळे व्यापार्यांना त्रास सहन करावा लागतो. भाजप सत्तेत आल्यावर हा टॅक्स संपवू. सिंडिकेट व्यवस्था मोडून काढू. धार्मिक उत्सवांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील. आसामप्रमाणे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवू. 5 तारखेनंतर बंगालमध्ये लहान मुलगीही रात्री निर्धास्तपणे बाहेर पडू शकेल.
शहा म्हणाले, पहिल्या टप्प्यातच जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. 152 पैकी 110 हून अधिक जागांवर आम्ही विजय मिळवू. दुसर्या टप्प्यानंतर बंगालमध्ये स्पष्ट बहुमताने भाजप सरकार स्थापन होईल. बंगालमध्ये भीतीचे वातावरण संपत आहे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. भूतकाळ विसरून भविष्यासाठी मतदान करा.