

इंफाळ; वृत्तसंस्था : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय एक-दोन दिवसात घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात एकवीस महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे सिंह यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव होता. विरोधी पक्षांनी हा मुद्दा संसदेतही लावून धरला होता. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्यपालांनी सिंह यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी सिंह यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला.