

मंडी (हिमाचल प्रदेश); वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या भीषण दुर्घटनेत अवघ्या 10 महिन्यांची नीतिका अनाथ झाली आहे. या चिमुकलीने आपले आई-वडील आणि आजी गमावले आहेत. मात्र, या दुःखाच्या प्रसंगी हिमाचल प्रदेश सरकारने तिला ‘राज्याची मुलगी’ घोषित करून तिच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे.
30 जूनच्या रात्री तलवाडा गावात ढगफुटी झाली. घरात पाणी शिरत असल्याचे पाहून नीतिकाचे वडील रमेश (वय 31) पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी बाहेर गेले. त्यांच्या मदतीला आई राधा देवी (24) आणि आजी पूर्णू देवी (59) सुद्धा गेल्या, पण त्या परतल्याच नाहीत. या दुर्घटनेत रमेश यांचा मृत्यू झाला, तर आई आणि आजी अद्याप बेपत्ता आहेत. घरात एकटीच रडणार्या नीतिकाला शेजार्यांनी वाचवून तिच्या नातेवाईकांना माहिती दिली.
या घटनेनंतर, सरकारने ‘मुख्यमंत्री सुख-आश्रय योजने’अंतर्गत नीतिकाला दत्तक घेतले आहे. महसूल मंत्री जगत सिंह नेगी यांनी सांगितले की, सरकार नीतिकाच्या पालनपोषणापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च उचलेल. तिला भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर किंवा अधिकारी जे काही बनायचे असेल, त्यासाठी पूर्ण मदत केली जाईल.