

जम्मू; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी ठाठरी परिसरात पुन्हा एकदा अचानक आलेल्या ढगफुटीजन्य पुराने (फ्लॅश फ्लड) मोठी हानी केली. या पुरामुळे घरे, दुकाने, वाहने आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, डोडा-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांतील ही दुसरी मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाठरी शहराच्या वरच्या डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात दगड, चिखल आणि मलबा शहरात वाहून आला. त्यामुळे अनेक निवासी तसेच व्यावसायिक इमारतींचे अंशतः नुकसान झाले असून, लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुराच्या तडाख्यामुळे डोडा-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने अडकली आणि प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. प्रशासनाने तातडीने बचाव आणि साफसफाईची मोहीम सुरू केली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. डोडाचे उपायुक्त कृष्ण लाल म्हणाले की, पावसामुळे निर्माण झालेल्या सर्व घटनांवर प्रशासनाने तातडीने प्रतिसाद दिला असून, बाधित रस्ते आणि संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.