

बंगळूर : सरकारी खात्यांमध्ये भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, याचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना कर्नाटकमधून उघडकीस आली आहे. कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडमध्ये अत्यल्प वेतनावर कार्यरत असणार्या माजी लिपिक कलाकप्पा निदागुंडी यांच्या घरी लोकायुक्तांनी छापा टाकला असता, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि रोकड सापडली आहे.
कलाकप्पा निदागुंडी यांचा पगार केवळ 15,000 रुपये होता. मात्र, लोकायुक्तांनी केलेल्या तपासात निदागुंडी यांच्याकडे जवळपास 30 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले. यामध्ये 24 घरे, 6 प्लॉटस्, 40 एकर कृषी जमीन, 1 किलोहून अधिक सोनं, अनेक गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. तसेच, निदागुंडी यांच्या पत्नी आणि भावाच्या नावावरही संपत्ती असल्याचा खुलासा झाला आहे.
लोकायुक्तांच्या कारवाईमागे कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडच्या एमडी बसवराजू यांच्या सूचनेनुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. कार्यकारी अभियंता अनिल पाटील आणि आनंद करलाकुंती यांच्या मार्गदर्शनाखाली, 72 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात ही कारवाई झाली. सरकारी प्रकल्पांत गैरव्यवहार 2019 ते 2025 या कालावधीत कोप्पल जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सीवरेज, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या 96 प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे.