

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी (7 नोव्हे.) सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय उद्घाटन केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायाधीशही उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीशांनी संग्रहालयातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वकिलासोबत संवाद साधला. सरन्यायाधीश म्हणाले की, भारतात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे का? यावर एआय वकिलाने सविस्तर उत्तर देताना सांगितले की, देशात फाशीची शिक्षा संवैधानिक आहे. सरन्यायाधीशही एआयच्या उत्तरावर खूश झाले.
संग्रहालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सरन्यायाधीश म्हणाले की, 'या संग्रहालयाची आखणी करण्यासाठी एक वर्ष लागले, मात्र सर्व काही ठरल्यानंतर ते तयार करण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक वेळ लागला. आम्हाला नुसते संग्राहलय बनवायचे नव्हते तर जागतिक दर्जाचे बनवायचे होते. एक संग्रहालय जे आपल्या संस्थांचे महत्त्व दर्शवते. माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने, हे संग्रहालय देशाला समर्पित करताना मला खूप आनंद होत आहे आणि आम्हाला आशा आहे की हे संग्रहालय तरुण पिढीला खूप काही शिकवेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे (एससीबीए) माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. न्यायाधीश ग्रंथालयाचे सार्वजनिक संग्रहालयात रूपांतर करण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. माजी एससीबीए अध्यक्षांनी बुधवारी लिहिलेल्या पत्रात पायाभूत सुविधांशी संबंधित निर्णयांवर तीव्र वेदना व्यक्त केल्या. कायदेशीर क्षेत्राशी निगडित लोकांच्या महत्त्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.