

Supreme Court Paper Throwing Incident: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या खंडपीठासमोर कागदपत्रे फेकून अपशब्द वापरणाऱ्या याचिकाकर्त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी घेतला आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची शक्यता असतानाही न्यायालयाने संयमाची भूमिका घेतली.
ही घटना न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर घडली. संबंधित याचिकाकर्ता स्वतःच आपली बाजू मांडत होता. सुनावणी सुरू असताना त्याने अचानक न्यायालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्वतःला "सार्वभौम" (Sovereign) असल्याचे सांगत त्याने न्यायालयासमोर कागदपत्रे हवेत फेकली आणि अपशब्दही वापरले. काही क्षणांसाठी न्यायालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन कोर्टरूमच्या बाहेर नेले. या प्रकाराची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दिली. त्यानंतर या व्यक्तीविरोधात कोणतीही पुढील कारवाई करू नये, असे निर्देश CJI यांनी दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या मते, असे प्रकार अनेकदा प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणूनबुजून केले जातात. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केल्यास त्यांना हवी असलेली प्रसिद्धी मिळू शकते. त्यामुळे अशा घटनांकडे अनावश्यक महत्त्व न देता त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल, अशी भूमिका न्यायालयाने घेतली.
सुनावणी सुरू होताच याचिकाकर्त्याने न्यायालयाला उद्देशून, "लखनौच्या एसीपीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश मी तुम्हाला देतो," असे म्हटले. त्यावर न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त करत, "तुम्ही आम्हाला आदेश देत आहात का?" असा प्रश्न विचारला.
याचिकाकर्त्याने, "माझ्याकडून एवढंच... बाकी सर्व नोंदीत आहे," असे उत्तर देत हातातील फाइल हवेत फेकली. त्यानंतर त्याने अपशब्दांचा वापर सुरू केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने कोर्टरूममधून बाहेर काढले.