सैन्य माघारीला चीन तयार

पूर्व लडाखमधील तणाव संपुष्टात आणण्यास सहमती
China prepares to withdraw its military from Ladakh
सैन्य माघारी बोलावले जाईल, असे संकेतही चीनने दिले.Pudhari File Photo
Published on
Updated on

बीजिंग; वृत्तसंस्था : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनविरोधात जागतिक पटलावर थेट तांडव केल्याने चीन अखेर नरमला आहे. लडाखमधील चार ठिकाणांवरून चीनने सैन्य माघारी घेतलेले आहे. उर्वरित ठिकाणांवरूनही जसजशी भारताशी लष्करी, राजनयिक पातळीवर चर्चा होत जाईल, तसतसे सैन्य माघारी बोलावले जाईल, असे संकेतही चीनने दिले आहेत.

चीनसोबत 75 टक्के प्रश्न मिटलेले आहेत, असे वक्तव्य जयशंकर यांनी केले होते. त्याचा तपशीलवार खुलासा करताना त्यांनी हा विषय सीमेपुरता मर्यादित आहे, असेही नंतर स्पष्ट केले. चीनसोबत भारताचे संबंध अत्यंत खराब स्थितीत आहेत, असे जयशंकर यांनी जगाला थेट सांगितले होते. भविष्यात त्याचा सगळ्या जगावर विपरीत परिणाम होणार आहे, असा इशाराही जयशंकर यांनी दिला होता.

पूर्व लडाख क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणाव संपुष्टात आणण्यात आणि मतभेद कमी करण्यास चीन आणि भारत सहमत झाल्याचे अधिकृत वक्तव्य चिनी संरक्षण मंत्रालयाने जयशंकर यांच्या वक्तव्यानंतर जारी केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आशिया विभागाचे महासंचालक ली जिन्साँग यांनी भारताचे चीनमधील राजदूत प्रदीपकुमार रावत यांची बीजिंगला भेटही घेतली. या भेटीत जिन्साँग यांची भूमिकाही नरमाईची असल्याचे सांगण्यात येते.

गलवान खोर्‍यात 4 वर्षांपूर्वी भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक धुमश्चक्री झाली होती. तेव्हापासून सीमेवर दोन्ही देशांत तणाव कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील वादावरही तोडग्यास चीन तयार झाला आहे. बफर झोनमधील काही ठिकाणांवर भारतीय जवानांना गस्त घालण्यास चीनकडून हटकण्यात येते. ते बंद होणार आहे.

पुढे काय?

भारत आणि चीनदरम्यान कोअर कमांडरस्तरीय चर्चेची 22 वी फेरी लवकरच होणार आहे.

जयशंकर यांच्या इशार्‍यानंतर ‘ड्रॅगन’ नरमला

चीनच्या मंत्रालयाची प्रतिक्रिया काय?

1. पूर्व लडाखमधील तणावाच्या ठिकाणांवर सैन्य माघारीबद्दल भारत आणि चीनमध्ये सहमती अखेर झालेली आहे.

2. दोन्ही देशांदरम्यान ठरल्या तारखेला दोन्ही बाजूंना मान्य असेल, असे समाधान शोधण्यासाठी परस्परांसोबत बैठका घेत आहोत.

काय म्हणाले जयशंकर?

1. द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करून चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत आपले सैन्य आणले. आम्ही त्याच पद्धतीने चीनला उत्तर दिले.

2. भारत आणि चीनदरम्यानचे संबंध इतके खराब झालेले आहेत की, जगाच्या एकुणातील भवितव्यावरही त्याचे पडसाद उमटणार आहेत.

3. जगात शक्तिसंतुलन हवे असेल, तर ते आशियातही आवश्यक आहे. नुसते जग बहुध्रुवीय असून चालणार नाही. आशियातही कुण्या देशाच्या विस्तारवादाला थारा नको.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news