

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- भारत आणि चीनमध्ये कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासंबंधी सहमती झाली असली तरी अद्याप या यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली नाही. या यात्रेसाठी साधारणतः जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचा कालावधी असतो. यासाठी मार्च-एप्रिल दरम्यान यात्रेकरूंची नोंदणी सुरू होणे आवश्यक असते. मात्र चीनने यात्रा सुरू करण्यासाठी फार सकारात्मक पाऊल उचलले नाहीत. कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन यांच्यात थेट विमानसेवा एकाच वेळी सुरू व्हावी, अशी अट चीनने घातल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार २०२० मध्ये भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यासाठी नवा करार करणे आवश्यक आहे. हा मुद्दा व्हिसा व्यवस्थेशी निगडित आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियातील ब्रिक्स शिखर परिषदेत भेट झाली होती. यानंतर यात्रेसंबंधी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे बोलले जात होते. दोन्ही देशांनी त्यावर सहमती दर्शवली होती. मात्र त्याला मूर्त रूप अद्याप आलेले नाही.