नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करायचा नाही आणि हरियाणा निवडणुकीतून धडा घेऊन तिथे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होता कामा नये, याची काळजी घेतली जावी, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. मराठा, ओबीसीसह इतरही सर्व समाजामध्ये समन्वय राहील, याची काळजी घेण्याचा सल्लाही पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसची महत्त्वाची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य जागावाटप आणि जाहीरनाम्याच्या शिफारशीबाबत या बैठकीत मंथन झाले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.
शेतकरी कर्जमाफीसह महिला, युवक, अशा विविध घटकांना न्याय देण्यासंदर्भात शिफारशी करण्यात आल्या. विदर्भातील एका मोठ्या कार्यक्रमात जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.