

नवी दिल्ली ः आग्रा येथील मीना बाजारातील राजा रामसिंग यांच्या कोठीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शंभर फूट उंचीचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्य्राच्या लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सवात बुधवारी केली. सोबतच राज्यात युक्तिदिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. लाल किल्ल्यातील जहाँगीर महाल परिसरातही थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला. लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते. आग्रा - मुंबई शिवाजी महाराज मार्ग नाव व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावे, येथूनच छत्रपती शिवाजी महाराज परत गेले होते, असे केंद्रीय मंत्री एस. पी. बघेल म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती आहे की, मीना बाजाराची जागा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी द्यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे स्मारक झाल्यावर ताजमहालपेक्षा जास्त लोक हे स्मारक बघायला येतील, असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढायचे. दख्खन विजयाचे स्वप्न घेऊन आलेला औरंगजेब त्याच भूमीत दफन झाला. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र शासन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात गायक नितीन सरकटे यांचे शिव गीते, शिवजन्म पाळणा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेवर आधारित शेर शिवराज नाटक, कोल्हापूरचे शिवकालीन मर्दानी खेळ आणि घोषणांनी पूर्ण लाल किल्ला परिसर दुमदुमून निघाला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात छावा चित्रपट फेम सिनेअभिनेता विकी कौशल खास आकर्षण होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि आग्र्याचे खासदार एस. पी. सिंह बघेल, विधानपरिषद सभापती राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, परिणय फुके, छावा चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, महाराष्ट्रासह देशातील इतर भागांतून 1500 शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज माझे सुपरहिरो आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात रायगडावरून केली. त्यानंतर आता आग्रा किल्यावर यायची संधी मिळाली. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. आग्र्याच्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पाय लागले. इथे येण्याची संधी मिळाले याबद्दल भावूक झालो आहे, असे विकी कौशल म्हणाले.
कार्यक्रमात अगोदर आयोजक विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यावर 4 तासांत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करायची आहे. यापेक्षा मोठा शिवभक्त कोणी असू शकत नाही. उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय म्हणाले, मीना बाजारात राजा रामसिंगची कोठी होती. तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांना ठेवण्यात आले होते. तिथे 100 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होणार असून, त्यासाठी महाराष्ट्र सरकार मदत केली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून नजरकैदेतून सुटले तो दिवस महाराष्ट्रात युक्तिदिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कार्यक्रमात बोलताना केली.