Maharashtra politics
नवी दिल्ली : बिहारला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली.

Politics News | एकनाथ शिंदेंनी शहांकडे केली रवींद्र चव्हाण यांची तक्रार

पक्ष प्रवेशांसाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार केला जात असल्याचा आरोप
Published on

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यात महायुतीतील राजकीय घडामोडींची माहिती त्यांनी शहा यांना दिली. महायुतीतील काही नेते महायुतीमधील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचे समजते.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. यातच महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काही प्रवेश आणि घडामोडींवरून वाद सुरू झाले आहेत. माध्यमांमध्येही दोन्ही बाजूंनी आम्ही जास्त सक्षम अशी वक्तव्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शहा यांच्याकडे केली. रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे आणि महायुतीच्या विरोधातील बंडखोर नेत्यांना काही लोकांकडून रसद पुरवली जात आहे. निव्वळ पक्ष प्रवेशांसाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समन्वयाचा दाखला देत एकप्रकारे नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवरच एकनाथ शिंदे यांनी या भेटीत प्रश्नचिन्ह उभे केल्याचे समजते.

याच भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रानंतर बिहार विधानसभा निवडणुकीतही ‘एनडीए’ने उत्तम कामगिरी केल्याचे सांगितले. या मोठ्या विजयानंतर महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र, काही नेते हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळत आहे. याच अनुषंगाने माध्यमांमध्येही कारण नसताना उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे आणि अशा गोष्टी युतीच्या विजयी घोडदौडीत अडथळे निर्माण करू शकतात. काही नेते केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापुढे होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच, युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. राजकीय भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केल्याचे समजते.

‘या’ पार्श्वभूमीवर झाली भेट

राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातो. गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे बिहारला जात आहात. तत्पूर्वी, ते दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, राज्यात शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी दिल्याच्याही चर्चा होत्या. यासह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुतीत तणावाची परिस्थिती आहे, एकमेकांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे प्रवेश घडवून आणले जात आहेत. अशा चर्चा असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही भेट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news