
Supreme Court Chief Justice Bhushan Gavai
नवी दिल्ली : शिष्टाचार उल्लंघनासारख्या क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, असे आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंगळवारी (दि.२०) केले. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्व संबंधितांनी या प्रकरणात आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश झाल्यावर पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर गेल्यावर शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याची खंत न्यायमूर्ती भूषण गवईंनी व्यक्त केली होती. त्यानंतर हा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या प्रकरणी टिप्पणी केली.
भारताचे सरन्यायाधीश यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान शिष्टाचाराच्या मुद्द्यांबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत. संबंधित सर्वांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्त्व देऊ नये, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले.
दरम्यान, मुंबईमध्ये १८ मे रोजी सरन्यायाधीश गवई यांनी सत्कार कार्यक्रमात राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल खंत व्यक्त केली होती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरन्यायाधीश गवई यांचे समर्थन केले होते. आपण शिष्टाचारावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याचे पालन करणे मूलभूत आहे, असे ते म्हणाले.
- भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित
- मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, पोलिस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी हे मुंबईत
- राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.
- कोणी व्हीव्हीआरपी येत असतील तर त्यांच्या विभागाशी संबंधित संपर्कासाठी समन्वय अधिकारी नेमणे आधीच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधी व न्याय विभागाने मुंबईसाठी, तर जिल्ह्यात असेल जिल्हाधिकार्यांनी समन्वयासाठी क्लास 1 अधिकारी नेमणे बंधनकारक असेल.