

नवी दिल्ली : नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गुरुवारी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची शिष्टाचार भेट घेतली. बुधवारी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार म्हणाले होते की, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि नेहमी मतदान केले पाहिजे. भारताची राज्यघटना, निवडणूक कायदे, नियम आणि त्यामध्ये जारी केलेल्या सूचनांनुसार भारत निवडणूक आयोग मतदारांच्या पाठीशी होता, आहे आणि नेहमीच राहील, असे ते म्हणाले.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांची १७ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेनुसार भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.