Chhattisgarh naxalite encounter updates
रायपूर : छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (दि.२०) सकाळपासून जोरदार चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील छोटेबेटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धुमश्चक्री सुरू असून, यामध्ये आतापर्यंत एका महिला नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कांकेर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आय.के. एलिसेला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांसोबतची चकमक अजूनही सुरू आहे. मात्र, घटनास्थळी असलेल्या पोलीस पथकाशी सध्या संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे या कारवाईबाबत अधिक तपशील तात्काळ उपलब्ध होऊ शकलेला नाही, असेही एलिसेला यांनी स्पष्ट केले आहे. संपर्क प्रस्थापित होताच अधिक माहिती दिली जाईल असेही ते म्हणाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस दल सतर्क झाले आहे.