छत्रपती शिवाजी महाराज 'भारत भाग्यविधाता' : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

दिल्लीत शिवचरित्रावरील चार हिंदी पुस्तकांचे प्रकाशन
Publication of four Hindi books on Shivacharitra in Delhi
दिल्लीत शिवचरित्रावरील चार हिंदी पुस्तकांचे प्रकाशनPudhari Photo
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराज हे ' भारतभाग्यविधाता' होते. त्यांचे चरित्र हे केवळ वाचण्यासाठी नसून त्यांचा प्रसार करणे हे भारतीय समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी (दि.31) केले. माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होणे भाग्याचे आहे. शिवाजी महाराजांची धोरणे आधुनिक युगास अनुकूल अशी होती. शौर्य, धर्म आणि नैतिकता हे त्यांचे विशेष गुण होते. त्यामुळेच ते अद्वितीय शासक ठरले. अशा महापुरुषांचे जीवन हे आजही प्रेरणादायी आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना जो न्याय इतिहासाने देणे अपेक्षित होते तो मिळाला नाही. तो मिळावा यासाठी आपण तत्पर राहूया, असेही ते म्हणाले. असेही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलते होते.

शिवचरित्रावरील चार हिंदी पुस्तकांचे प्रकाशन

हिंदवी स्वराज स्थापना महोत्सव आयोजन समिती दिल्ली, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि श्रीभारती प्रकाशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केदार फाळके लिखित 'छत्रपती शिवाजी महाराज', गजानन मेहेंदळे लिखित 'छत्रपति शिवाजी महाराज न होते तो' आणि पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात आणि मोहन शेटे लिखित 'स्वराज्य संरक्षण का संघर्ष' व ' अठारहवी शताब्दी का हिंदवी साम्राज्य' या मूळ मराठी पुस्तकांच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत झाला.

शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार करणे हे भारतीय समाजाचे कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांच्या शासनप्रणालीत जनहित सर्वोपरी होते. त्यांनी सदैव धर्म आणि संस्कृती यांचा सन्मान केला. हिंदवी स्वराज्य हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत, त्यांनी नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार केला होता. त्यांच्याच प्रेरणेने आज भारतीय नौदलाचे ध्वज आणि प्रतीके तयार करण्यात आली आहे, सैन्यकुशलता ही शिवाजी महाराजांची विशेषतः होती. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि सैन्यकुशलतेच्या बळावर त्यांनी अनेक युद्ध जिंकले. असेही माजी राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले.

शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान

यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ज्या वेळी उल्लेख होतो, त्या त्या वेळी नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत होते. येणारी हजारो वर्षे ही भावना येतच राहणार आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. देशासाठी जगावे आणि गरज असल्यास देशासाठी मरावे, हा चिरंजीव विचार छत्रपतींनी दिला आहे. आपल्या जीवनकाळात त्यांनी अनेक उदात्त विचार राष्ट्राला दिले. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी, याचा आदर्श शिवाजी महाराजांनी घालून दिल्याचे होसबळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराज हे आपल्या जीवनकाळातच 'लिजेंड' झाले होते. केवळ भारतच नव्हे तर परदेशातील गुलामगिरी विरोधातील लढ्यांनाही त्याचे जीवन प्रेरणादायी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य स्वतःसाठी नव्हते तर ते रयतेच्या कल्याणासाठी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य सांभाळताना कृषी, सुशासन, उद्योग, व्यापार, जहाज बांधणी या सगळ्या गोष्टीत लक्ष घातले. छत्रपती महाराजांचे शासन आदर्श होते म्हणून त्याचे उदाहरण आपण आजही देतो. असेही दत्तात्रय होसबळे म्हणाले.

माजी राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितली 'ती' आठवण

आपल्या भाषणादरम्यान बोलताना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, मी राष्ट्रपती असताना मला रायगडावर जाण्याचे सौभाग्य मिळाले. रायगडावर चालत असताना साधारण एक किलोमीटरभर अंतर पायी चालायचे होते. मला ते थोडे कठीण वाटत होते. मात्र माझ्यापुढे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. भगतसिंह कोश्यारी मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, रायगड किल्ल्याबद्दल गोष्टी सांगत होते. ते समजून घेताना मी ते अंतर कधी कापले आणि तो वेळ कसा गेला मला कळले देखील नाही, इतका सुंदर आणि प्रेरणादायी जीवनपट छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अशी आठवण रामनाथ कोविंद यांनी सांगितली. रायगड किल्ला अप्रतिम आहे, जे रायगडावर गेले नसतील त्यांनी रायगडावर जाण्याचा संकल्प करा, असे आवाहनही रामनाथ कोविंद यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news