पुढारी ऑनलाईन :
चंदिगडमध्ये नाईट क्लब जवळ आज (मंगळवार) बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा क्लब रॅपर बादशहाचा असल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला देशी बॉम्बने केल्याचे म्हटले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी सेक्टर २६ स्थित नाईट क्लबवर संदिग्ध स्फोटके फेकली. या दोघांनी आज मंगळवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बॉम्ब हल्ला केला. मात्र हे कमी क्षमतेचे बॉम्ब असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
ज्या क्लबमध्ये हा स्फोट झाला तो रॅपर बादशहाचा असल्याचं म्हंटल जात आहे. घटनास्थळाच्या व्हिडिओवरून या बॉम्बच्या हल्ल्यात खिडकीच्या काचा फुटल्याचे दिसून येत आहे. बॉम्ब हल्ल्याची माहिती मिळताच चंदिगड पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेच्या तपासाला सुरूवात झालेली आहे. घटनास्थळावरून सँपल गोळा करण्याचे काम सुरू आहे. बॉम्ब नाशक पथक आणि सेंट्रल फॉरेन्सिक टिम घटनास्थळी पोहोचली आहे.
खंडणीच्या उद्देशाने देशी बॉम्ब फेकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र तरीही पोलिस या घटने पाठिमागचा हल्लेखोरांचा उद्देश तपासून बघत आहे. चंदिगड पोलिस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने प्रकरणाचा तपास करत आहे.