Shivraj Singh Chouhan | केंद्रीय पथक करणार दुष्काळाची पाहणी

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हेही येणार महाराष्ट्र दौर्‍यावर
Shivraj Singh Chouhan |
Shivraj Singh Chouhan | केंद्रीय पथक करणार दुष्काळाची पाहणी
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही राज्यांतील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी व वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारची विशेष पथके पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. ते स्वतः अधिकारी आणि तज्ज्ञांच्या पथकासह महाराष्ट्राचा दौरा करणार असून केंद्रीय पथक येत्या ३ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेणार आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी येथे आयोजित ‘राष्ट्रीय कृषी परिषद-रब्बी अभियान २०२६’चे उद्‌घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील दोनतृतीयांश भाग दुष्काळाच्या सावटाखाली असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. कर्नाटकातही दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून प्रत्यक्ष पाहणीच्या अहवालानंतर तातडीने आवश्यक ती पावले उचलली जातील. महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. अशा भागांतील शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपलब्ध पाण्यानुसारच पिकांची निवड करा

कमी पाणी उपलब्ध असणाऱ्या भागांत अधिक पाण्याची गरज असलेल्या पिकांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते, असा इशारा कृषिमंत्र्यांनी दिला. यावर त्‍यांनी जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाणी यांचा ताळमेळ घालूनच पिकांची निवड करावी, असा सल्‍लाही दिला.

पंचनामे, पूर्ण अहवालानंतर शेतकऱ्यांना मिळणार मदत : महसूलमंत्री बावनकुळे

यवतमाळ : पिकांचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले. यवतमाळ दौऱ्यावर त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधून शासनाची भूमिका मांडली.

ते म्हणाले, घाईगडबडीने मदत जाहीर केल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे. दुष्काळी मदतीतून एकही पात्र शेतकरी सुटणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कुणी मागणी केली म्हणून लगेच मदत जाहीर करून टाका, असे चालत नाही. घाईत मदत जाहीर केली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे संपूर्ण अहवाल येणे आवश्यक आहे. तूर, कापूस, सोयाबीन, हळद, संत्री व बागायती पिकांच्या नुकसानीचे निकष वेगळे आहेत. या सर्वांचे अचूक पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिकृतरीत्या मदत जाहीर करतील.

दुष्काळाचे राजकारण नको

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, दुष्काळाचे राजकारण करणे चुकीचे आहे. दुष्काळाच्या झळा शेतकरी आणि शेतमजुरांना बसत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. तसेच, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून पत्र देणे हे त्यांचे कामच आहे; पण केवळ पवारांनी पत्र दिले म्हणून आम्ही मदत करत आहोत, असे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news