

नवी दिल्ली: महाराणी ताराराणी यांच्या नावे टपाल तिकीट काढण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जयंतीवर्ष आहे. त्यानिमित्त सरहद, पुणे यांच्या वतीने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सरहदच्या वतीने केंद्रीय दुरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्याकडे महाराणींच्या नावे टपाल तिकिट काढण्यात यावे, अशी मागणी केली होती.
या मागणीनंतर भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या अनुमोदनाने केंद्र सरकारने त्यांच्या नावे टपाल तिकिट काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लवकरच एका भव्य कार्यक्रमाता या टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात येणार आहे.
याबाबत दिल्लीत बोलताना सरहदचे समन्वयक लेशपाल जवळगे म्हणाले की, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. राजाराम महाराजांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. मुघल सत्तेविरुद्ध त्यांनी उभा केलेला लढा, प्रशासनातील दूरदृष्टी, युद्धनीती आणि धैर्य आजही प्रेरणादायी आहे. महिला नेतृत्व, शौर्य, राष्ट्रनिष्ठा, प्रशासनातील कौशल्य यांचे प्रतीक असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या नावे टपाल तिकिट काढण्याचा निर्णय हा भारतीय इतिहासातील महिलांच्या योगदानाचा सन्मान करणारा आहे.
हे टपाल तिकिट हे केवळ सन्मानचिन्ह नसून इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, तो देशभरातील इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि विशेषतः महिलांसाठी अभिमानास्पद आहे, असेही जवळगे म्हणाले.