

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत 62,370 कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार भारतीय हवाई दलासाठी 97 एलसीए एमके-1ए विमानांची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये 68 लढाऊ आणि 29 दोन आसनी (ट्विन-सीटर) विमानांचा समावेश असून, यासोबत संबंधित उपकरणेही पुरवली जातील. हा करार ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला मोठी गती देणारा ठरणार आहे.
या विमानांचे वितरण 2027-28 पासून सुरू होईल आणि पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. या विमानांमध्ये 64 टक्कपेक्षा जास्त स्वदेशी बनावटीचे साहित्य वापरले जाईल. विशेष म्हणजे, जानेवारी 2021 मध्ये झालेल्या मागील एलसीए एमके-1ए करारानंतर, या नवीन विमानात 67 अतिरिक्त स्वदेशी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या प्रगत स्वदेशी प्रणालींच्या एकत्रिकीकरणामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला आणखी बळकटी मिळेल. या प्रकल्पाला जवळपास 105 भारतीय कंपन्यांचा मजबूत पुरवठादार गट थेट पाठिंबा देत आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.