

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगामध्ये मंकीपॉक्सचा वाढता धोका पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी (दि.१७) आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मंकीपॉक्सच्या परिस्थितीचा आणि या रोगाचा प्रसार रोखण्यासाठीच्या तयारीचा तपशीलवार आढावा घेतला. तसेच काही निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. (Monkeypox)
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) १४ ऑगस्ट २०२४ रोजी मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सज्ज झाले असून त्यासाठी ही बैठक झाली. (Monkeypox)
सध्या तरी भारतात एकही मंकी पॉक्सचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, सावधगिरीची बाब म्हणून, काही उपाययोजना करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सर्व विमानतळ, बंदरे आणि जमीनीवरील सीमांच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य यंत्रणांनी सजग राहावे, असा निर्णय झाला. याबरोबरच ३२ चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत सुधार करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्कात आल्यावर.
शरीरसंबंध, स्पर्श वा मिठी याद्वारे हा संसर्ग पसरतो.
बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे - खोकण्याद्वारे वा बोलताना उडणाऱ्या थुंकीतून संसर्ग पसरण्याची काहीशी शक्यता
तुमच्या त्वचेला भेगा असतील किंवा जखम असेल तर त्याद्वारे, श्वसनमार्गाद्वारे किंवा डोळे - नाक किंवा तोंडाद्वारे ही विषाणू शरीरात शिरकाव करू शकतो.
संसर्ग असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे, पांघरूण वा टॉवेल वापरल्याने किंवा त्या गोष्टींना स्पर्श केल्यानेही संसर्ग पसरतो.
माकड, उंदीर किंवा खार या प्राण्यांद्वारे हा विषाणू पसरतो.
२०२२ मध्ये या साथीचा उद्रेक झाला, तेव्हा शारीरिक संबंधांमुळे संसर्ग अधिक पसरला होता.