

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने वायनाड दुर्घटनेचा राष्ट्रीय आपत्तीच्या श्रेणीत समावेश केला आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचे वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी स्वागत केले आहे. प्रियंका गांधी यांनी 'एक्स' वर पोस्ट करून याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत प्रियंका गांधी यांनी लिहिले की, मला आनंद होत आहे की, अखेर वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना खूप मदत होईल आणि हे निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल आहे. यासाठी लवकरात लवकर पुरेसा निधी दिला गेला तर आपण सर्वांचे आभारी राहू, असेही त्या म्हणाल्या.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रियंका गांधी यांनी शून्य प्रहर दरम्यान वायनाडमधील दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्र सरकारकडे मदत पॅकेजची मागणी केली होती. ही दुर्घटना नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली होती. यासाठी त्यांनी केरळच्या सर्व खासदारांसह संसदेच्या मकरद्वारावर निदर्शनेही केली होती.
केंद्र सरकारवर राजकीय भेदभावाचा आरोपही त्यांनी केला होता. वायनाड दुर्घटनेबाबत प्रियंका गांधी यांनी ०४ डिसेंबर रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. यामध्ये त्यांनी वायनाड दुर्घटनेतील लोकांना मदत करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी केली होती.