

कोलकाता : सरकारने चांद्रयान-4 मोहिमेला मंजुरी दिली आहे. ही मोहीम चंद्रावरील नमुने परत आणण्यासाठी आखण्यात आली आहे, जी भारताची आतापर्यंतची सर्वात जटिल चंद्र मोहीम असेल. चांद्रयान-4 हे 2028 चे लक्ष्य आहे. चंद्रावरून नमुने परत आणण्याची क्षमता सध्या फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढील आर्थिक वर्षात आणखी सात प्रक्षेपणांसह आपल्या सर्वात व्यस्त टप्प्यासाठी सज्ज झाली आहे, तर भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान 2027 साठी निर्धारित वेळेनुसारच होणार आहे, अशी माहितीही नारायणन यांनी दिली. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, इस्रो विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षमतेमध्ये झपाट्याने वाढ करण्याच्या टप्प्याची तयारी करत आहे. या आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी इस्रोने व्यावसायिक दळणवळण उपग्रह, अनेक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही मोहिमांसह सात आणखी प्रक्षेपणांचे लक्ष्य ठेवले आहे. पूर्णपणे भारतीय उद्योगाने तयार केलेल्या पहिल्या पीएसएलव्हीचे प्रक्षेपण हा एक महत्त्वाचा टप्पा असेल.